पुणे:प्रतिनिधी
पोर्श कार अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले ससून सर्वोपचार रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे आता नव्या वादात अडकले आहेत. रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये त्यांचा थेट सहभाग असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा लवकरच त्यांचा तबा घेणार असून, तपास अधिक खोलात जाणार आहे.
या रॅकेटबाबत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आता डॉ. तावरे यांना सहआरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. याप्रकरणी एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल आहे. यामध्ये रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रूबी हॉलमधील डॉक्टर व व्यवस्थापनातील लोक यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकाराची तक्रार आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी दिली होती.
पोलिस आयुक्तालयातील जुन्या प्रकरणांचा आढावा घेताना या रॅकेटवरील समितीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती लागला. त्यामध्ये डॉ. तावरे यांचे नाव असूनही पूर्वी गुन्हा दाखल झालेला नव्हता. यामुळे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली असता, तावरे यांची या रॅकेटमध्ये म्हत्वाची भूमिका असल्याचे निष्पन्न झाले.
डॉ. अजय तावरे यांच्यावर असलेले गंभीर आरोप:
•डॉ. तावरे यांनी किडनी दाते आणि रुग्णांची थेट मुलाखत घेतली होती.
•किडनी प्रत्यारोपणासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे त्यांनी स्वतः पडताळली होती.
•‘रिजनल ऑथोरायझेशन कमिटी’चे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.
•आठ सदस्यांची ही समिती त्यांच्या नियंत्रणाखाली काम करत होती.
या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
0 Comments